बरेली: बदायूं पोलिसांनी एका स्थानिक साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांसह १७ जणांविरोधात शेतकऱ्यांऐवजी दलालांकडून ऊस खरेदी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी कुमार प्रशांत यांच्या आदेशानुसार इस्लामनगर पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली. दलालांकडून ऊस खरेदी प्रकरणात हे सर्वजण सहभागी असल्याचे आढळून आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साखर कारखान्याकडे ऊसाच्या थकबाकीपोटी शेतकऱ्यांचे सुमारे ४० कोटी रुपयांचे देणे आहे. कारखान्याने शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला नाही.
याउलट फक्त मध्यस्थांच्या माध्यमातून ऊस खरेदी केली जात असल्याची तक्रार आली होती असे जिल्हाधिकारी कुमार प्रशांत यांनी सांगितले.
ऊस विभागाच्या एका टीमने पोलिसांची मदत घेऊन कारखान्याच्या परिसरात रात्री छापासत्र सुरू केले. यावेळी अन्य जिल्ह्यांतून ऊस आणलेल्या अनेक ट्रॅक्टर, ट्रॉली आढळल्या.
संभल आणि बुलंदशहर या जिल्ह्यांमधून हा ऊस आणल्याचे तपासणीत उघड झाले. ट्रॅक्टरधारकांकडे ऊसासाठीचा वैध परवानाही आढळून आला नाही.
त्यानंतर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांसह १७ जणांविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
हा ऊस जप्त करण्यात आला असून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे थकित बिल देण्याची नोटीस कारखान्याला बजावण्यात आली आहे.