बिजनौर : उत्तर प्रदेशमधील ११९ साखर कारखान्यांपैकी सुमारे ९७ कारखान्यांनी शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या, जुन्या दराने उसाचे पैसे दिले आहेत. सरकारने ऊसाची राज्य किमान किंमत (एसएपी) जाहीर केलेली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शेतकऱ्यांना ४८ टक्क्यांहून अधिक पैसे मिळाले आहेत.
बिजनौर साखर कारखान्याचे प्रशासन अधिकारी ए. के. सिंह यांनी सांगितले की, साखरेच्या बाजारपेठेत सध्या मंदीची स्थिती आहे. सरकारने यावर्षी साखरेच्या किमान दरात वाढ केलेली नाही. आम्ही सर्व करांसहित ३२६० रुपये प्रति क्विंटल दराने साखर विक्री करीत आहेत. कर वजा जाता कारखान्यांना प्रति क्विंटल ३१०० रुपये मिळतात. हा साखरेचा किमान दर आहे मात्र शेतकऱ्यांना उस पिकवण्यासाठी येणारा खर्च हा कारखान्यांना मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक आहे. त्यामुळे साखर उद्योगाने सरकारला यावर्षी चालू गळीत हंगामात एसएपी वाढवू नये अशी मागणी केली आहे.
दरम्यान, आझाद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ऊस खरेदी केंद्रांवर मिळणाऱ्या पावतीवर कोणताही दर लिहीलेला नाही. कारखाने चालू गळीत हंगामातील उसाचे पैसे गेल्या हंगामातील एसएपीनुसार दिली जात आहे.