लखनौ : उत्तर प्रदेश निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ११ जिल्ह्यातील ५८ विधानसभा मतदारसंघासाठी गुरुवारी सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास २० टक्के मतदान झाले आहे. कोविड प्रोटोकॉलचे पण करीत सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते सुरू राहील. अकरा वाजेपर्यंत २०.०३ टक्के मतदान करण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार संकल्पना अकरा वाजता आग्रामध्ये २०.३० टक्के, अलिगड मध्ये १७.९१ टक्के, बागपतमध्ये २२.३० टक्के, बुलंदशहरमध्ये २१.६२ टक्के, गौतम बुद्ध नगरमध्ये १९.२३ टक्के, गाझियाबादमध्ये १८.२४ टक्के, हापुडमध्ये २२.८० टक्के, मथुरेत २०.७३ टक्के, मेरठमध्ये १८.५४ टक्के, मुजफ्फरनगर येथे २२.६५ टक्के तथा शामली मध्ये २२.८३ टक्के मतदान झाले.
समाजवादी पक्षाने करौना विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर गरीब मतदारांना धमकावून परत पाठवले गेल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. पक्षाने निवडणूक आयोग आणि शामलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना टॅग करत ट्विट केले आहे की, डुडूखेडामधील बूथ क्रमांक ३४७, ३४८ आणि ३४९ वरुन गरीब मतदारांना धमकावून परत पाठवण्यात आले आहे. याबाबत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर बागपतमध्ये बोगस मतदान करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान सुरुवातीला काही ठिकाणी मतदान यंत्रांत बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तेथे तातडीने बदल करण्यात आला आहे.