कानपूर : कानपूर आयआयटीमध्ये झालेल्या एका संशोधनामुळे प्रदूषणाची वाढती समस्या दूर करण्यात उसाची भूमिका आता महत्त्वाची असल्याचे स्पष्ट झाले. आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी औषधापासून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोकेमिकल सेन्सरसाठी उसाच्या सालीवर स्क्रीन प्रिंटेड इलेक्ट्रोड तयार केले आहेत. उसाच्या सालीचा पृष्ठभाग वापरल्यामुळे ते पूर्णपणे जैवविघटनशील आहे. यातून १०० टक्के प्रदूषण कमी होईल असे संशोधन असल्याचे सांगितले जाते. भारत सरकारने आयआयटीच्या संशोधनाला पेटंटही दिले असून, आता खासगी कंपन्यांच्या मदतीने उसाच्या सालीपासून स्क्रीन प्रिंटेड इलेक्ट्रोड तयार करण्याची तयारी सुरू आहे.
याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डॉ. नचिकेत आशिष गोखले आणि डॉ. चिरंजीवी श्रीनिवासराव वूसा यांच्यासह आयआयटी कानपूरच्या केमिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक सिद्धार्थ पांडा यांनी हे संशोधन केले आहे. आतापर्यंत, इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या स्क्रीन प्रिंटेड इलेक्ट्रोडसाठी प्लास्टिक आणि सिरॅमिकचा वापर सब्सट्रेट म्हणून केला जात आहे. त्यामुळे होणारे प्रदूषण पाहता जगात इको-फ्रेंडली इलेक्ट्रोड्सची गरज होती. प्रो. पांडा यांच्या टीमने उसाच्या सालीच्या सहाय्याने स्क्रीन प्रिंटेड इलेक्ट्रोड तयार केले आहेत, म्हणजेच वरच्या पृष्ठभागावर, जे पूर्णपणे इलेक्ट्रोकेमिकल सेन्सिंग करण्यास सक्षम आहेत.
या वृत्तात पुढे म्हटले आहे की, टीमने उसाच्या सालीचा सब्सट्रेट म्हणजेच इलेक्ट्रोडचा ‘बेस सरफेस’ म्हणून वापर केला आहे. उसाच्या सालीवर स्क्रीन प्रिंटेड इलेक्ट्रोड तयार केल्यानंतर विविध इलेक्ट्रॉनिक सेन्सरच्या सहाय्याने यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. संशोधकांच्या मते, भविष्यात उसाच्या सालीला स्क्रीन प्रिंटेड इलेक्ट्रोडसाठी सब्सट्रेटचा कायमस्वरूपी पर्याय बनवता येईल. जगभर उसाची उपलब्धता मुबलक असून उत्पादनात दरवर्षी वाढ होत आहे. उसाच्या सालीवर तयार केलेल्या इलेक्ट्रोडची चाचणी केली असता ते २५ ते ५५ अंश तापमानात योग्य असल्याचे आढळून आले.
त्याचा वापर सोने, चांदी किंवा कार्बन इलेक्ट्रोडवरही करून पाहिला आहे आणि त्याचे परिणाम पूर्णपणे अनुकूल आहेत. यामुळे, भविष्यात ते अंतराळ तंत्रज्ञान, मोबाइल फोन किंवा इतर उपकरणांमध्ये स्क्रीन प्रिंटेड इलेक्ट्रोड म्हणूनदेखील वापरले जाऊ शकते. याबाबत आयआयटी कानपूरचे प्रा. सिद्धार्थ पांडा म्हणाले की, स्क्रीन प्रिंटेड इलेक्ट्रोडच्या विकासामध्ये उसाच्या सालीचा पृष्ठभाग वापरण्यात आला आहे. ऊस नेहमीच उपलब्ध असतो आणि तो खराब झाल्यास नैसर्गिकरित्या आपोआप नष्ट होतो. यामुळे प्रदूषणाची समस्या उद्भवणार नाही, याबरोबरच प्रयोगशाळेच्या स्तरावरही त्याचे उत्पादन सहज होऊ शकते.