लखनौ : गेल्या साडेचार वर्षांमध्ये उत्तर प्रदेश सरकारने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाच्या कल्याणासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील ऊस उत्पादकांना फायदा देण्यासाठी सरकार साखर कारखान्यांच्या विस्तारीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. ऊस विभागाकडून १३ साखर कारखान्यांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू केले आहे. विस्तारीकरण पूर्ण झाल्यास उत्तर प्रदेशातील ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल. यासोबतच कारखान्यांची ऊस गाळप क्षमताही वाढेल. ऊस विभागाने विस्तारीकरणाच्या देखरेखीसाठी समिती स्थापन केली आहे. ऊस विभागाने दिलेल्या माहितीनुसार १३ कारखान्यांची क्षमता वाढविल्यानंतर उसाची गाळप क्षमता १,६७,५०० क्विंटल वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा ५,०१,८७६ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल.
ऊस उत्पादकांना थेट लाभ मिळावा यासाठी गळीत हंगामात १२० साखर कारखाने सुरू ठेवले जाणार आहेत. सध्याच्या ऊस उद्योगाच्या स्थितीत सुधारणेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असून उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक क्षेत्रात २७.७५ लाख हेक्टरची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण ऊस गाळप क्षमता वाढीसाठी मुंडेरवा साखर कारखान्यासह १३ कारखान्यांच्या गाळप क्षमतेत वाढ करण्याचे काम सुरू आहे.
Uniindia.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढीसह ऊस उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे कारखान्याच्या देखभाल आणि विस्ताराचे काम सुरू करण्यात आले आहे. २५ ऑक्टोबरनंतर कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link