लखनौ : उत्तर प्रदेशात आज, २८ ऑक्टोबरपासून गळीत हंगामास सुरुवात झाली आहे. पश्चिम युपीतील बहुतांश कारखान्यांनी शुक्रवारपासून गाळप सुरू केले. यावर्षी राज्यात उसाचे बंपर उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारनेही ऊस उत्पादन, साखर उत्पादनाची आकडेवारी एकत्रित केली आहे. सर्व शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर दिली जातील असे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यासाठी त्यांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, शुक्रवारी मुझफ्फरनगरचा खाईखेडी, बिजनौरचा अफजलगढ़, धामपूर, बरकातपूर आणि कुंदकी या कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी इथेनॉल उत्पादनासाठी रसाचा अधिक वापर केला जाईल. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन अधिक होईल. राज्यातील धामपूर, द्वारिकेश, मेजापूर, फरीदपूर आणि बरकातपूर हे पाच कारखाने यावेळी उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादन करतील. ७१ कारखाने मोलॅसीसपासून इथेनॉल निर्मिती करतील. एक महिना उशीरा हंगाम सुरू झाल्याने १२० कारखाने जादा क्षमतेने चालवले जाणार आहेत. हंगाम २०२२-२३ मध्ये एकूण २८.५३ लाख हेक्टरमध्ये ऊस पिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८४ हजार हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. यंदा उसाचे २३५० लाख टन उत्पादन होईल अशी शक्यता आहे. तर साखर उत्पादन ११० लाख टन होईल. एकूण इथेनॉल उत्पादन २०० कोटी लिटर होईल.