मेरठ : उत्तर प्रदेशात शुक्रवारी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सर्व आठ लोकसभा जागांवर ६०.१ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत मतदानात ६.३ टक्के इतकी लक्षणीय घट दिसून आली आहे. गेल्यावेळी ६६.४ टक्के मतदान झाले होते. विश्लेषकांनी मतदानाचा टक्का घसरणीचे श्रेय मुख्यत्वे स्थानिक घटकांना दिले आहे. यामध्ये राज्याच्या ऊस पट्ट्यातील उन्हाळ्यातील तापमानात अचानक झालेली वाढ तसेच उसाच्या कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी आणि उदासीनता यास कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश साखर कारखानदारांनी उसाचे गाळप सामान्य वेळेपेक्षा एक महिना आधी पूर्ण केले आहे, त्यामुळे गव्हाची पेरणी लवकर झाली आहे. विश्लेषकांनी सांगितले की, जेव्हा निवडणुका सुरू झाल्या तेव्हा शेतकरी आधीच शेतात कापणी करत होते आणि सर्वसाधारणपणे या काळात इतर कामांसाठी कोणालाही रस नसतो. याव्यतिरिक्त, यावर्षी उसावरील लाल सड रोगामुळे उत्पादनात सुमारे ११ टक्के घट झाली आहे.
शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे कटूता निर्माण झाली आहे. निवडणूक तज्ञांच्या मते, “मागील निवडणुकांमध्ये असलेल्या ध्रुवीकरणाच्या वातावरणाचा अभाव हेही एक कारण असू शकते. चौधरी चरणसिंग विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक के. के. शर्मा म्हणाले की, बहुतांश जागांवर मुख्य विरोधी पक्षाने अल्पसंख्याक उमेदवार उभा केलेला नाही, ज्यामुळे अनेकदा दोन्ही पक्षांमध्ये कटू स्पर्धा आणि भाषणबाजी होते. पारंपारिक भाजप समर्थकांमध्ये ४०० पार घोषणेमुळे एकीकडे अतिआत्मविश्वास वाढू शकतो आणि दुसरीकडे गैर-भाजप मतदारांमध्ये निराशेची भावना निर्माण होऊ शकते, ज्यामुळे दोन्हीकडील मतदार मतदानासाठी बाहेर पडत नाहीत.
विश्लेषकांनी सांगितले की, सहारनपूरमधील मतांची टक्केवारी ध्रुवीकरणामुळे, पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्व आठ जागांपैकी सर्वाधिक ६५.९ टक्के आहे. या जागेवर भाजपचे राघव लखनपाल आणि काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद यांच्यात लढत होत आहे. २०१९ मध्ये येथे ६३.१ टक्के मतदान झाले होते.