आग्रा : दीर्घ काळापासून मथुरा जिल्ह्यातील बंद पडलेला एकमेव साखर कारखाना पुन्हा सुरू होण्याची शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आग्रा विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आमदार लक्ष्मी नारायण चौधरी यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या विभागाचे आमदार आता योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात ऊस विकास तथा साखर कारखाना खात्याचे मंत्री बनले आहेत. आग्रा विभागातील या एकमेव साखर कारखान्याची प्रतीदिन गाळप क्षमता १२५० टन इतकी आहे. २००८ मध्ये बहुजन समाज पार्टीच्या सरकारने हा कारखाना बंद केला होता.
एन एच २ लगत असलेला हा कारखाना १०० एकर क्षेत्रावर आहे. १९७८ मध्ये तत्कालीन आमदार बाबू तेजपाल सिंह यांनी याची स्थापना केली होती. गेल्या वर्षी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारखाना पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. याचबरोबर यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्री चौधरी यांनी सांगितले की, आम्ही याबाबत लवकरच बैठक घेणार आहोत. कारखाना लवकरात लवकर कसा सुरू करता येईल, यासंबंधी प्रक्रिया सुरू केली जाईल. ते म्हणाले, की शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेवर आणि योग्य मिळाली पाहिजेत याला प्राधान्य दिले जाईल. मथुरा ऊस समितीचे उपाध्यक्ष ठाकूर मुरारी सिंह यांनी सांगितलेकी, ५०,००० शेतकरी समितीशी जोडले गेलेले आहेत. त्यांना कारखाना पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.