लखनौ : लखनौत लाल बहादूर शास्त्री ऊस उत्पादक शेतकरी संस्थेच्या ऑडिटोरियममध्ये जी. एस. ए. इंडस्ट्रीजद्वारे ॲग्रीझोन गौरव दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उत्तर प्रदेशच्या साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर खास पाहुणे म्हणून विभागाचे सह आयुक्त डॉ. व्ही. बी. सिंह उपस्थित होते. ॲग्रीझोन गौरव दिवसाच्या कार्यक्रमात मुख्य पाहुणे संजय भुसरेड्डी यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रेरणेने आणि ऊस मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करून राज्यातील ऊस तथा साखर कारखाना समित्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी आणि यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी १४६ समित्यांमध्ये फार्म मशीनरी बँक स्थापन करण्यात आली आहे, असे भुसरेड्डी यांनी सांगितले.
ई-नवभारतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भुसरेड्डी यांनी सांगितले की, सध्या शेतकऱ्यांना ऊस लागवड, तोडणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही कामे आधुनिक यंत्रांद्वारे खूप सोपी होतील. फार्म मशीनरी बँक योजनेतून अतिशय अल्प किमतीला शेतकऱ्यांना कृषी यंत्रे उपलब्ध होतील. यामध्ये ७४ ट्रॅक्टर्स, प्रगत कृषी यंत्रे, ऑटोमॅटिक शुगर केन प्लान्टर, ऑटोमॅटिक शुगर केन ट्रेंच प्लान्टर, चीजलर, पॉवर स्प्रे आदींचा समावेश आहे. नॅनो युरियाच्या फवारणीसाठी ३० ड्रोनही मशीनरी बँकेत समाविष्ट करण्यात येतील. यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. एका फार्म मशीनरी बँकेपासून पाच युवकांना रोजगार मिळणार आहे. यावेळी भुसरेड्डी यांनी शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी पंचामृत तंत्र वापरण्याचा सल्ला दिला. या अंतर्गत उसाची स्ट्रेच पध्दतीने लागवड, ट्रॅश मल्चिंग, व्यवस्थापन, ठिबक सिंचन, आंतरपीक इत्यादींचा अवलंब केला जातो. यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.