लखीमपूर खिरी : उत्तर प्रदेशातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी आता केळीच्या शेतीकडे वळले आहेत. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार बिले मिळण्यास होणारा उशीर आणि ऊस शेतीसाठी लागणाऱ्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात जवळपास 35 लाखाहून अधिक शेतकरी ऊस शेती करीत आहेत. केळीच्या शेतीचा पर्याय निवडल्यानंतर मिळणाऱ्या नफ्याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. लखीमपूर खिरी जिल्ह्यात जवळपास १ हजार एकर क्षेत्रात केळी लागवड केली जाते. यामध्ये कॅडिला आणि G9 या दोन प्रकारची केळी पिकवली जात आहेत.
सद्यस्थितीत राज्यात 68,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रात केळी लागवड केली आहे. दरवर्षी 30 मेट्रिक टनहून अधिक केळी उत्पादन घेतले जाते. केळी उत्पादनात लखीमपूर अग्रेसर आहे. त्यापाठोपाठ कुशीनगर, महाराजगंज, अलाहाबाद आणि कौशांबी यांचा समावेश होता. ऊसासाठीच्या खतासाठी प्रती एकर 5000 रुपये खर्च येतो. मात्र, केळीची लागवड करून प्रती वर्ष १५००० रुपयांहून अधिक फायदा मिळतो असे शेतकऱ्यांनी सांगितले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एएनआयला सांगितले की, त्यांना २५००० रुपये मिळविण्यासाठी एक वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक काळ वाट पाहावे लागते. मात्र, केळी हे एकमेव पिक आहे की जेथे तत्काळ फायदा मिळतो. एएनआयला शेतकऱ्यांनी सांगितले की, एका वर्षात शंभरहून अधिक गावात पूर्णपणे केळीच्या बागा दिसतील. केळीच्या बागांमध्ये शेती बदलत असताना साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची प्रलंबित बिले देण्यास सुरुवात केली आहे.