उत्तर प्रदेश : थकीत ऊस बिलांप्रश्नी बेमुदत आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

शामली : गळीत हंगाम संपत आला तरी राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे १०० टक्के ऊस बिले दिलेली नाहीत. पैसे देण्याबाबत ऊस विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही अनेक कारखान्यांनी डोळेझाक केली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शामली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी उसाची थकीत बिले देण्याची मागणी केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालून पैसे न दिल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला.

शामली साखर कारखान्याच्या मालकांनी एप्रिल महिन्यापर्यंत १०० टक्के बिले देण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कारखान्यावर आरआरसीची कारवाई केल्यानंतरही त्यांच्याकडून पैसे न भरण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याबाबत संताप व्यक्त करत ३० जूनपासून शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला. यावेळी शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्याच्या समस्याही मांडल्या. यावेळी संजीव शास्त्री, मेनपाल, विजयपाल सिंग, सुभाष झाल, धर्मेंद्र कुमार, विनय कुमार, सुबोध कुमार, जगदीप कुमार, रमेशचंद, पंकज बनात आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here