गाझियाबाद : बस्ती जिल्ह्यातील बंद पडलेल्या साखर कारखान्याचा मालक असल्याचे भासवून तेथील स्क्रॅप विकण्याच्या बहाण्याने किमान १० भंगार विक्रेत्यांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीला गाझियाबाद पोलिसांनी शनिवारी अटक केली. स्वस्त दरात स्क्रॅप देण्याच्या आमिषाने संशयिताने उत्तर प्रदेशात अनेकांची फसवणूक केली आहे.
संशयित मोहम्मद कमरुद्दीन असे त्याचे नाव असून तो मूळचा बस्ती येथील. आहे. तो लखनौमधील हजरतगंज येथील शेअर ट्रेडिंगचे कार्यालय चालवत होता. त्याने एमबीएचे शिक्षण घेतले असून कोविड महामारीदरम्यान त्याला शेअर ट्रेडिंग व्यवसायात तोटा झाला. यानंतर भंगार डीलर्सची फसवणूक करण्याचा प्रकार त्याने सुरू केला असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत पोलिस उपायुक्त (शहर) राजेश कुमार म्हणाले की, “आम्ही तपास सुरू केला तेव्हा संशयित मूळ बस्ती येथीलच असल्याचे आढळले. जिल्ह्यातील आपल्या गावी बंद असलेल्या साखर कारखान्याचा मालक असल्याचे त्याने भंगार विक्रेत्यांना सांगितले होते. काही प्रकरणांमध्ये, तो साखर कारखान्यातील भंगार स्वस्त दरात विकण्यासाठी उपलब्ध असून आपला कारखान्याच्या मालकांशी सामंजस्य करार झाल्याचे त्याने सांगितले होते.
पोलिसांनी सांगितले की, संशयिताने साखर कारखान्याचे भंगार विकण्यासाठी राज्यातील विविध भंगार विक्रेत्यांशी संपर्क साधला होता. त्यांना आपल्या विविध खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले होते. बंद पडलेल्या कारखान्याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकीची रक्कम देता यावी म्हणून संशयित व्यापाऱ्यांना स्वस्त दरात भंगार खरेदी करण्याची ऑफर देत असे. जेव्हा हे विक्रेते सुरुवातीला पैसे भरून बस्ती येथील कारखान्यामध्ये गेले, तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. संशयिताने अशा प्रकारे गाझियाबाद, मेरठ, बस्ती, लखनौ, बाराबंकीसह अनेक ठिकाणी वेगवेगळ्या डीलर्सची फसवणूक केली. आम्हाला त्याच्याविरुद्ध १० तक्रारी मिळाल्या आहेत. आतापर्यंत २० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आकडा समोर आला आहे.
इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्सद्वारे संशयिताचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक करण्यात गाझियाबाद पोलिसांना यश आले. १४ ऑगस्ट रोजी गाझियाबादमधील एका भंगार विक्रेत्याने कमरुद्दीनविरुद्ध १.५ कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. नंदग्राम पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Chinimandi.com वाचत राहा.