लखनौ : उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योगी आदित्यनाथ सरकारने दरवाढीची मोठी भेट दिली आहे. गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री योगी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ऊस दरवाढीसह अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. उसाच्या दरात प्रती क्विंटल २० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिन्ही वर्गवारीतील ऊसाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सध्या उसाला ३५० रुपये प्रती क्विंटल दर मिळतो. नव्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना ३७० रुपये प्रती क्विंटल दर मिळणार आहे.
याबाबत ऊस मंत्र्यांनी सांगितले की, सरकारने उसाचा दर ३७० रुपयांपर्यंत वाढवला आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे २२०० कोटी रुपये जादा मिळतील. यापूर्वीच्या समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात पाच वर्षात केवळ २५ रुपयांची दरवाढ केली होती. मात्र, योगी आदित्यनाथ सरकारमध्ये गेल्या ६ वर्षांत ५५ रुपयांची वाढ केली आहे. ऊसाची ४० टक्के वाहतूक केली जाते. माल वाहतुकीत ४५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर केवळ ४९ कोटी रुपयांच्या खर्चाचा बोजा वाढेल. सद्यस्थितीत १२० कारखाने ऊस गाळप करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, मंत्रिमंडळाने बैठकीत खाजगी क्षेत्रातील नोएडात जेएसएस युनिव्हर्सिटी, लखनौत सरोज इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि आग्र्यात शारदा युनिव्हर्सिटी सुरू करण्यासंबंधीच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली. तोट्यात चाललेल्या मेट्रो रेल्वेला दिलासा देण्यासाठी, त्याच्या मालमत्तांना घरपट्टी, सेवा शुल्क, पाणी कर, जाहिरात शुल्क, पार्किंग शुल्क यातून सूट देण्याचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश सेमी कंडक्टर पॉलिसी-२०२४ च्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे.