पिलिभीत : उत्तर प्रदेश सरकारने पुरनपूर येथील किसान सहकारी साखर कारखाना (पिलिभीत) आणि बरेली जिल्ह्यातील सेमीखेडा कारखान्याच्या नूतनीकरण योजनेला मंजुरी दिली आहे. यासाठी ३५ कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. याबाबत अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही साखर कारखान्याची मशीनरी खूप जुनी असून गळीत हंगामात त्याच्या वापराने शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण होत होत्या. अनेकवेळा गाळप सुरू असतानाच कारखाना बंद पडल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.
याबाबत, टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, युपी को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी फेडरेशनचे कार्यकारी संचालक रमाकांत पांडे म्हणाले की, निधीला मंजुरी मिळाली आहे आणि लवकरच कारखान्यांचे नूतनीकरण सुरू होईल. एकूण रकमेपैकी १८ कोटी रुपये पुरनपूर कारखान्यासाठी तर उर्वरित १७ कोटी रुपये सेमीखेडा कारखान्यासाठी देण्यात आले आहेत.