देशात साखरेच्या उत्पादनाला गती मिळाली आहे. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये गेल्या हंगामाच्या तुलनेत आता साखर उत्पादनात घट दिसून आली आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ११९ साखर कारखान्यांनी ३०.९० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या हंगामात, २०२०-२१ मध्ये ३१ डिसेंबर २०२० अखेर १२० कारखाने सुरू होते. त्यांनी ३३.६६ लाख टन साखर उत्पादीत केली होती.
मात्र ऊस बिले देण्यात राज्यातील कारखान्यांची कामगिरी चांगली आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातील कारखान्यांकडे दृष्टिक्षेप टाकला असता राज्यात १८९ कारखान्यांनी ४५.७७ लाख टन साखर उत्पादन केले आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत १७९ कारखान्यांनी ३९.८६ लाख टन साखर उत्पादीत केली होती. गेल्यावर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत साखर उत्पादन ५.९१ लाख टनाने अधिक आहे.
देशात ४९२ साखर कारखान्यांनी ११५.५५ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. तर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ४८१ कारखान्यांनी ११०.७४ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा उत्पादन ४.८१ लाख टनांनी अधिक आहे.