देशात साखर कारखान्यांची कामगिरी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये गाळप हंगाम जोरदार सुरू असला तरी या हंगामात गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी साखर उत्पादन झाले आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात १२० साखर कारखान्यांनी १५ जानेवारी २०२२ पर्यंत ४०.१७ लाख टन साखर उत्पादन केले आहे. २०२०-२१ मध्ये याच मुदतीत एवढेच साखर कारखाने सुरू होते. त्यांनी ४२.९९ लाख टन साखर उत्पादन घेतले होते.
जर देशपातळीवरील विचार केला तर १५ जानेवारी २०२२ पर्यंत देशात ५४० साखर कारखाने सुरू होते. त्यांनी आतापर्यंत १५१.४१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तर गेल्यावर्षी १५ जानेवारी २०२१ पर्यंत ४८७ कारखान्यांनी १४२.७८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. गेल्या हंगामाच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत ८.८३ लाख टन उत्पादन अधिक झाले आहे.