मेरठ : उत्तर प्रदेश सरकारने प्राधान्यक्रम निश्चित केल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आपल्या गाळप हंगामाची तारीख निश्चित केली आहे. जिल्ह्यात सर्वात प्रथम सहकारी मोहिउद्दीनपूर साखर कारखाना आपला गळीत हंगाम सुरू करणार आहे. सर्व साखर कारखाने याच महिन्यात आपला हंगाम सुरू करतील. सलग दोन दिवस झालेल्या पावसाने गळीत हंगामाच्या तयारीवर परिणाम झाला. मात्र, ऊस विभागाने आधी निश्चित केलेल्या तारखेलाच कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व कारखाने याच महिन्यात आपला गळीत हंगाम सुरू करीतल. सर्वात आधी २५ ऑक्टोबर रोजी मोहिउद्दीनपूर कारखाना गाळप सुरू करेल. त्यानंतल २७ रोजी मवाना आणि नंगलामल कारखान्यात ऊस गाळपास सुरुवात होईल. किनौनी कारखाना २९ रोजी गाळप सुरू करणार आहे. दौराला आणि सकौती साखर कारखान्याकून ३० ऑक्टोबर ही तारीख गळीतासाठी निश्चित करण्यात आली आहे. सर्व कारखान्यांमध्ये विधीवत पूजा-अर्चा करून हंगामाला प्रारंभ होईल. मात्र, ऊसाची खरेदी दिवाळीनंतरच सुरू होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर गळीत हंगाम सुरळीत होईल.