लखनऊ: उत्तर प्रदेशमधील साखर कारखाने आता बंद होऊ लागले आहेत. राज्यातील १२० कारखान्यांनी आतापर्यंत सुमारे ११० टन साखर उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी केलेल्या १२६ टन साखरेच्या उत्पादनाच्या तुलनेत यंदा १२ टक्के उत्पादन कमी झाले आहे. उद्योगातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात सध्याचा हंगाम ११०.५० लाख टनापेक्षा जास्त उत्पादन होऊन संपू शकतो.
याबाबत प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, २४ मे अखेर चालू हंगामात गाळप करणाऱ्या १२० कारखान्यांनी शेतकऱ्यांना २०,३२४ कोटी रुपये ऊस बिल दिले आहे. तर अद्याप ११,९१३ कोटी रुपये थकीत आहेत. राज्यात सुरू असलेल्या ९३ खासगी साखर कारखान्यांनी आपल्या पैशांपैकी ६५ टक्के ऊस बिले दिली आहेत. तर अद्याप सुमारे १०,०८७ कोटी रुपये थकीत आहेत. तर राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३८.४८ टक्के ऊस बिले दिली असून १६२९ कोटी रुपये प्रलंबित आहेत. उत्तर प्रदेशच्या नगर निगमच्या तीन कारखान्यांनी अद्याप ४९ टक्के पैसे दिले असून त्यांच्याकडे १९७ कोटी रुपये थकीत आहेत.
आतापर्यंत कारखान्यांनी १०१८.८२ लाख टन ऊसाचे गाळप करून १०९.८१ लाख टन साखर उत्पादन केले आहे.