पुणे : देशात आतापर्यंत २४७ लाख टन साखर उत्पादन झाले असून हंगामाअखेर एकूण २६४ लाख टनांवरच साखर उत्पादनाचे गाडे अडणार असल्याचा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्रात तीस लाख टन, उत्तर प्रदेशात साडेनऊ लाख टन तर कर्नाटकमध्ये दहा लाख टन इतकी घट दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये ८७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तेथे अद्याप ४८ कारखाने सुरू आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राचा साखर हंगाम संपुष्टात आल्याची स्थिती असून सहा कारखाने कसेबसे सुरू आहेत. सद्यस्थितीत केवळ ८० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यातून देशात सलग तीन वर्षे साखर उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र पिछाडीवर गेल्याचे चित्र आहे.
देशात गेल्या हंगामात ३१९ लाख टन साखर उत्पादित झाली होती. चालू हंगामात साखर उत्पादनात ५४ ते ५५ लाख टन घट झाली असून, त्याचे प्रमुख कारण महाराष्ट्र आहे. गेल्यावर्षी, हंगाम २०२३-२४ हंगामात महाराष्ट्रात ११० लाख टन तर उत्तर प्रदेशामध्ये १०४ लाख टन साखर उत्पादित झाली होती. त्याआधी, सन २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात १०५ लाख टन तर उत्तर प्रदेशमध्ये १०४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. याचबरोबर सन २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात १३८ लाख टन तर उत्तर प्रदेशमध्ये १०२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. देशात २०१५-१६ पर्यंत महाराष्ट्राचेच वर्चस्व अबाधित होते.