गोरखपूर : राज्यातील ऊस उत्पादकांवर २०१७ पूर्वी सिंचन, वीज यांची कमतरता आणि थकीत बिले यांसह पाण्याच्या कमतरतेमुळे आपली पिके जाळून टाकण्याची वेळ आली होती. मात्र, गेल्या सहा वर्षात उत्तर प्रदेशातील कोणताही शेतकरी स्वतःला असाहाय्य मानत नाही आणि त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेले नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. ते म्हणाले की, आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दलालांच्या तावडीतून मुक्त केले आहे. आणि आज शेतकऱ्यांना तोडणी पावतीसाठी इकडे-तिकडे भटकावे लागत नाही. कारण त्यांना स्मार्टफोनवर तोडणी पावती मिळत आहे. ते म्हणाले की, उत्तर प्रदेश इथेनॉल उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे.
सहकारी ऊस आणि साखर कारखाना समित्यांमध्ये स्थापित कृषी मशीनरी बँकांसाठी ७७ ट्रॅक्टर्सना हिरवा झेंडा दाखवताना आदित्यनाथ म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. होळीच्या पूर्वसंध्येला आज डीबीटीच्या माध्यमातून २ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठविण्यात येत आहेत. ते म्हणाले की, युपीमध्ये २.६० लाख शेतकरी आता पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. आम्ही गेल्या साडेतीन वर्षात त्यांच्या खात्यांमध्ये ५१ हजार कोटी रुपयांचा निधी पाठवला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, आज उत्तर प्रदेशने एक नवा विक्रम स्थापित केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्यांदाच २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक ऊस बिले मिळाली आहेत. ते म्हणाले की, देसातील अनेक राज्यांकडे वार्षीक २ लाख कोटी रुपयांचे बजेटही नाही.
योगी म्हणाले की, गेल्या सरकारांनी जेथे साखर कारखाने बंद पाडण्याचे काम केले आणि मिळेत त्या दरावर कारखाने विकून टाकले. मात्र, आम्ही कोणत्याही साखर कारखान्याला बंद केलेले नाही. उलट बंद पडलेले कारखाने पु्न्हा सुरू केले. मुंडेरवा आणि पिपराईच साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. जेव्हा जगातील साखर कारखाने बंद होते, तेव्हा युपीतील ११९ कारखाने सुरू होते. ते म्हणाले की, कोविड १९ काळात जेव्हा देशभरात सॅनिटायझरचा पुरवठा कमी होता, तेव्हा सरकारने युपीतील सर्व नगरपालिकांना मोफत सॅनिटायझर पुरवठा केला. यासोबतच देशातील २७ राज्यांमध्ये सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आले. ते म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सर्वाधिक ग्रीन इथेनॉल उत्पादन होत आहे. ते म्हणाले की, पुर्वी आमचा पैसे पेट्रो डॉलरच्या नावावर आमच्या विरोधात दहशतवाद्यांच्या रुपात खर्च केला जात होता. मात्र, आता शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये ऊसाच्या रुपात इथेनॉल उत्पादन केले जात आहे. युपी सध्या देशातील इथेनॉलचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे.