लखनऊ : उत्तर प्रदेशच्या अबकारी विभागाने अलिकडेच संपलेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ४१,२५२ कोटी रुपयांचा उच्चांकी महसूल मिळाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात, २०२१-२२ मध्ये मिळवलेल्या ३६,३२१ कोटी रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत जवळपास १३.५८ टक्के म्हणजे ४,९३१ कोटी रुपयांची वाढ महसुलात नोंदवली गेली आहे.
अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, वर्ष २०२२-२३ मध्ये अवैध आणि बनावट दारूमुळे जिवीत हानी होण्याची कोणतीही घटना घडलेली नाही. राज्याच्या खजिन्यात उच्चांकी महसूल जमा करण्यासह अबकारी विभाग इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देवून राज्याच्या समग्र औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
ते म्हणाले की, गेल्या आर्थिक वर्षात सणासुदीच्या पूर्वी सात खास ठिकाणी एक विशेष अभियान राबविण्यात आले. आणि सीमावर्ती भागात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ते म्हणाले की, २०२२-२३ मध्ये ९१,११० एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. आणि २७ लाख लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे. ते म्हणाले की, एकूण २९,००० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून ६९२ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.