लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने कोविड १९ महामारीच्या संकट काळात परिस्थिती बदलण्यासाठी चांगले काम केले आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या मार्गदर्शनामुळे राज्यातील अनेक निर्यातदारांनी राज्याची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश निर्यातीच्या क्षेत्रात देशात पाचव्या क्रमांकाचे आपले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. यामध्ये साखर उत्पादन हा मुख्य घटक आहे. त्यातून गेल्या काही वर्षांपासून निर्यात वाढली आहे.
साखरेसोबतच तांदूळ, औषधे, रेशिम उद्योग, खेळणी, खते इत्यादी साहित्याची परदेशातून ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे गतीने पावले उचलत राज्य सरकारने निर्यातदारांना भरपूर सवलती देण्यासह कामकाज सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यातून उत्पादने परदेशी निर्यात करण्यास मदत मिळाली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशाने कोरोना महामारीच्या काळात निर्यातीच्या क्षेत्रात तेलंगणा, केरळ, पंजाब, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांना मागे टाकले आहे. प्रमुख निर्यातदार म्हणून समोर आलेल्या राज्याने यासाठी स्वतःचे स्वतंत्र धोरण ठरवले आहे. त्यानुसार सरकार निर्यातदाराची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यात १० हजारांहून अधिक निर्यातदार आहेत. कोरोना महामारीच्या काळात एप्रिल २०२० आणि नोव्हेंबर २०२० या दरम्यान ७२,५०८ कोटी रुपयांच्या मालाची निर्यात केली गेली. यामध्ये दूध, आटा, कृत्रिम फुले, रेशिम आदींचा समावेश आहे.