लखनौ : जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रालोदच्यावतीने (RLD) गुरुवारी (१७ ऑगस्ट) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत बिले देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन देणार आहे. याबाबत आरएलडीचे नेते प्रवक्ते अनिल दुबे यांनी सांगितले की, पक्षाच्यावतीने राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल. ते म्हणाले की, जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जर वेळेवर पावले उचलली गेली नाहीत तर पक्षाच्यावतीने आंदोलन केले जाईल. अलिकडेच रालोदच्या अनेक आमदारांनी मुख्यमंत्री योगी यांची भेट घेवून शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेवर दिली जावीत याची मागणी केली होती.
दुबे म्हणाले की, उत्तर प्रदेशात ऊस हा केवळ शेतकरी, कामगारच नव्हे तर व्यापाऱ्यांच्या उपजिविकेचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांचे अद्याप हजारो कोटी रुपये थकीत आहेत. ते कंगाल होण्याच्या मार्गावर आहेत. युपी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने सांगितले होते की, २०२२-२३ या हंगामात शेतकऱ्यांचे ५,००० कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. दुबे यांनी सांगितले की, पक्षाच्यावतीने दोषी कारखान्यांविरोधात योग्य कारवाई केली जावी आणि थकीत बिले व्याजासह वसूल करावीत अशी मागणी केली जाणार आहे.