लखनौ : साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यात होत असलेल्या दिरंगाईबाबत समाजवादी पार्टीने योगी आदित्यनाथ सरकारवर टिकास्र सोडले आहे. भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केवळ पोकळ घोषणा केल्या. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या प्रती असंवेदनशील असल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून दिसून आले आहे अशी टीका सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली.
अखिलेश यादव म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे सांगण्यात आले. वास्तवात शेतकऱ्यांना महागाईचा दुहेरी फटका सोसावा लागत आहे. बाजारात शेतमालाला कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. योगी आदित्यनाथ सरकारने गेल्या चार वर्षांपासून उसाच्या दरात एक रुपयाही वाढ केलेली नाही असे त्यांनी सांगितले.
जेव्हा आम्ही सत्तेवर होतो, तेव्हा २०१२ मध्ये सरकारने एसएपीच्या दरात ४० रुपये प्रति क्विंटल वाढ केली होती. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे थकवले गेल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. आधीच्या गळीत हंगाातील १०००० कोटी रुपये थकीत आहेत. आताच्या हंगामातील कोट्यवधी रुपये थकीत असल्याचे सपा अध्यक्ष यादव यांनी सांगितले.