लखनौ : श्री रेणुका शुगर्सने उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील अनामिका शुगर मिल्स हा स्वतंत्र कारखाना सुमारे २०० कोटी रुपयांना विकत घेण्याचा करार जवळपास निश्चित केला आहे. द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, रेणुका शुगर्सचे अधिकारी याबाबत प्रतिक्रीयेसाठी उपलब्ध नव्हते, तर अनामिका शुगर मिल्सचे संचालक अशोक अग्रवाल यांना पाठवलेल्या ई-मेलला सुद्धा उत्तर मिळालेले नाही.
साखर उद्योगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील छोटे कारखाने मोठ्या कारखान्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत. आणखी काही लहान कारखान्यांचे मोठ्या कारखान्यांकडून अधिग्रहण केले जाण्याची शक्यता आहे. अनामिका शुगर मिल्सचा बुलंदशहर येथे कारखाना आहे. या कारखान्याची ऊस गाळप क्षमता दररोज ४,००० टन आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारखान्याकडे कोणतीही डिस्टिलरी नाही. मात्र, अधिग्रहणानंतर विस्तारात यासाठी खूप वाव असेल.