लखनौ : २०१९-२० या हंगामात सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या वर्षात साखरेचे उत्पादन २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात गेल्या गळीत हंगामातील १२६ लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत यंदा १०० लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे.
इथेनॉल उत्पादनात झालेली वाढ, ऊसाच्या शेतांमध्ये सततच्या पावसाने झालेली किटकांच्या संख्येत वाढ हे यामागी मुख्य कारण आहे. उद्योगातील प्रमुख संस्था असलेल्या इस्माने इथेनॉल निर्मितीकडे वळलेल्या हंगामामुळे साखरेचे उत्पादन १०५ लाख टनापर्यंत होईल असे अनुमान व्यक्त केले होते. मात्र, स्थानिक पातळीवरील अहवालानुसार, अपेक्षित उतारा आणि उत्पादन घटल्याने साखरेचे उतपादन आणखी घसरण्याची शक्यता आहे.
एका कारखानदारांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये ऊस उपलब्ध नसल्याने काही साखर कारखाने वेळेआधीच बंद करावे लागले आहेत. आतापर्यंत चार साखर कारखाने बंद झाले आहेत. महिना अखेरीस आणखी काही कारखान्यांना ऊसाअभावी गाळप बंद करावे लागेल अशी शक्यता आहे. देशातील एकूण २० लाख टन साखरेचे इथेनॉलमध्ये रुपांतर होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी ६.७५ लाख टन साखर उत्तर प्रदेशमधील असेल. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात ६.५४ लाख टन तर कर्नाटकमध्ये ५.४१ लाख टन साखरेऐवजी इथेनॉल उत्पादन होईल.
उत्तर प्रदेशच्या ऊस विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात साखरेचे उत्पादन सरासरी ९८ ते १०५ लाख क्विंटल होण्याची अपेक्षा आहे. इथेनॉल उत्पादनावर साखर कारखान्यांनी भर दिला आहे. त्यातून अतिरिक्त साखर उत्पादनाची समस्याही सुटणार असून शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेही उपलब्ध होतील.