उत्तर प्रदेश : मोफत रेशन योजनेंतर्गत जूनपर्यंत साखरही मिळणार

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळाने मोफत रेशन योजनेला ३० जून २०२२ पर्यंत, तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत पुढील तीन महिने नागरिकांना अन्नधान्यासह डाळ, मीठ, साखर मोफत मिळणार आहे. नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याची माहिती दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आम्ही पंतप्रधान गरीब कल्याण अन्नधान्य योजनेला ३१ मार्चपासून ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील १५ कोटी लोकांना होणार आहे.

अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले. यात मोफत रेशन वितरण योजना उपयुक्त ठरल्याचे मानले जात आहे. आदित्यनाथ यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, राज्य सरकारने एप्रिल २०२० पासून अंत्योदय लाभार्थ्यांना आणि पात्र कुटुंबांसाठी ही योजना राबवली आहे. अंत्योदय योजनेखालील कुटुंबांना ३५ किलो धान्य मिळते. पात्र कुटुबांना पाच किलो प्रती युनिट दराने धान्य मिळते. यासोबत राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबाला रिफाईंड तेल, एक किलो डाळ, मीठ दिले जाते. याशिवाय, एक किलो साखरही दिली जात आहे.

पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, कॅबिनेट मंत्री सुरेश कुमार खन्ना, स्वतंत्र देव सिंह उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here