लखनौ : योगी आदित्यनाथ सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासह त्यांच्यासोबत कडक धोरणही स्वीकारले जात आहे. ऊस विकास विभागाने आपल्या अधिकाऱ्यांची कार्यक्षमता तपासण्यासाठी ऑनलाईन परीक्षेचे आयोजन केले आहे. या परीक्षेत त्यांच्या विभागातील ज्ञानाची चाचणी घेतली जाईल. अधिकाऱ्यांची वर्गनिहाय परीक्षेतून विभागाशी संबंधीत माहिती किती आहे याची पडताळणी होईल. २५ जून रोजी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत कार्यप्रणालीबाबत १५० बहुविकल्पिय प्रश्न विचारले जातील. ऊस विकास विभागाकडून आपली कार्यप्रणाली सुधारण्यासाठी अनोखे प्रयोग केले जात आहेत.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दरवर्षी विभागाशी संबंधित प्रश्नांची विचारणा करून अधिकाऱ्यांचे ज्ञान कितपत आहे, त्यांची कार्यक्षमता किती आहे, याची पडताळणी केली जात आहे. यापूर्वीही सरकारच्या निर्देशाने एका परीक्षेचे आयोजन केले होते. ऊस विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, २५ जून ते २५ जुलै २०२२ या कााळात विविध टप्प्यांमध्ये ही ऑनलाईन दक्षता परीक्षा होईल. उत्तर प्रदेश साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक रमाकांत पांडेय हे परीक्षा नियंत्रक आहेत. ऊस विकास विभागाच्या मुख्यालयाकडून जारी होणारे आदेश, प्रपत्र, बुकलेट, पॅम्प्लेट व इतर मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाते की नाही, त्याची माहिती संबंधित यंत्रणेला किती आहे, याची पडताळणी यातून केली जाते. दिडशे प्रश्नांच्या परीक्षेत योग्य उत्तराला दोन गुण तर चुकीच्या उत्तराला एक निगेटिव्ह गुण अशी रचना असल्याचे अप्पर मुख्य सचिवांनी सांगितले.