अमरोहा : उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील ऊस उत्पादकांनी आपल्या पारंपरिक शेतीऐवजी स्ट्रॉबेरी उत्पादन आणि इतर पर्यायांवर भर दिला आहे. साखर कारखान्याकडून उशीराने मिळणारे उसाचे पैसे या मुख्य कारणामुळे येथील शेतकरी ऊस शेतीपासून दूर जाऊ लागले आहेत.
अमरोहा-मेरठ सीमेवरील प्रल्हाद कुमार आणि शिशुपाल हे शेतकरी पिढ्यान पिढ्या ऊस शेती करतात. मात्र, यावर्षी दोघांनीही स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिशुपाल यांनी सांगितले की, माझ्या एका नातेवाईकांनी मुजफ्फरनगर येथे प्रायोगिक तत्त्वावर एक एकर जागेत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले. त्यांना चांगले पीक मिळाले आणि उत्पन्नही दुप्पट झाले. त्यांनी आम्हाला रोपे दिली आहेत. आता आम्हीही स्ट्रॉबेरीचे पिक घेण्यास सुरुवात करीत आहोत.
या परिसरातील शेतकऱ्यांसमोर स्ट्रॉबेरीच्या रोपांची कमतरता ही मुख्य समस्या आहे. शेतकऱ्यांच्या एका गटाने हिमाचल प्रदेशमधू २ रुपये प्रति रोप दराने रोपे आणली आहेत. या पिकाची वाढली लोकप्रियता पाहून अनेक युवकांनी आता महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि हिमाचल प्रदेशमधून रोपे आणून विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पारंपरिक पिकांसोबत स्ट्रॉबेरी उत्पादन हे येथील शेतकऱ्यांना अतिरिक्त वरदान ठरत आहे. स्ट्रॉबेरीची लागवड डिसेंबरमध्ये केली जाते. मार्चपर्यंत फलधारणा होते. मार्चनंतर ऊस लावण केली जाऊ शकते. याशिवाय स्ट्रॉबेरी विक्रीतून तत्काळ पैसे मिळतात. मात्र, ऊसाचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दीर्घकाळ वाट पहावी लागते. त्यामुळे या पिकातून खूप फायदा मिळत आहे.