बागपत : साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ३७० रुपये प्रती क्विंटल कमाल भाव मिळत आहे. तरीही आता ऊस ऑनलाइन विकला जात आहे. तेथे प्रती क्विंटल ३,५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गोड आणि पांढऱ्या उसाची अधिक मागणी आहे. असा ऊस असलेल्या शेतकऱ्यांकडे कंपन्यांचे प्रतिनिधी संपर्क साधत आहेत. एक नव्हे तर ऑनलाइन खाद्यपदार्थ विकणाऱ्या दहाहून अधिक कंपन्यांनी ऊस विक्री सुरू केली आहे. या कंपन्या शेतकऱ्यांकडून ऊस घेतात. तो धुवून त्याचे छोटे तुकडे करून पॅकेटमध्ये विकतात.
काही कंपन्या एक किलो तर काही अर्ध्या किलोची पाकिटे विकत आहेत. यामध्ये सर्वात मोठी बाब म्हणजे एक किलो उसाचे पाकीट सर्वात कमी ३५ रुपये दराने उपलब्ध आहे. यामध्येही ऊस सोलल्यानंतर त्याचे छोटे तुकडे करून पॅकेटमध्ये विकल्यास त्याचा दर ५० रुपये किलोपर्यंत आहे. अशाप्रकारे एक क्विंटलचे बोलायचे झाले तर साडेतीन हजार रुपये इतक्या कमी दराने ऊस ऑनलाइन विकला जात आहे. सध्या दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, गुरुग्राम, फरीदाबाद, सोनीपत, चंदीगड, पंचकुला आणि इतर ठिकाणी बहुतांश कंपन्या ऊसाची ऑनलाइन विक्री करत आहेत. लहान शहरांचा पिन कोड टाकल्यास तेथे डिलिव्हरी नाकारली जाते.