लखनऊ: विरोधी पक्षाची मानसिकता नकारात्मक आहे. आमच्या प्रत्येक कामात त्यांना चूकच दिसून येते. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते नक्राश्रू ढाळत आहेत. विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे अशी टीका उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी केली. ज्यांनी साखर कारखाने विकले आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवले ते लोक आता शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवून फूस लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ऊस मंत्री सुरेश राणा म्हणाले, ज्यांनी आपल्या कार्यकाळात कोट्यवधींचे साखर कारखाने कवडीमोल दराने विकले ते आज आमच्यावर आरोप करीत आहेत. शेतकऱ्यांचे नेते असलेल्या चौधरी चरणसिंह यांच्या कर्मस्थलीमधील रमाला साखर कारखान्याच्या आधुनिकीकरणाची मागणी दशकभरात अव्हेरली गेली. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आत्महत्या केल्या. आज शेतकऱ्यांसाठी खोटे अश्रू ढाळणारे आणि खोटी सहानभूती दाखवणारे तेव्हा कोठे होते ? असा सवात मंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनानुसार, उसाची उच्चांकी बिले आम्ही दिली आहेत. उच्चांकी ऊस गाळप, उच्चांकी साखर उत्पादन या गोष्टी का नजरेआड केल्या गेल्या आहेत अशी विचारणा मंत्री राणा यांनी केली. ते म्हणाले, कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात जेव्हा देश आणि जगातील सर्व व्यवहार बंद राहिले, तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व साखर कारखाने उत्कृष्टरित्या सुरू राहिले. सॅनिटायझरचेही उच्चांकी उत्पादन झाले. ते दुर्लक्षिले गेले आहे.
जनतेला सर्व ठाऊक आहे…
ऊस मंत्री राणा म्हणाले, जनतेला आणि शेतकऱ्यांना सर्व काही माहीत आहे. सन २०१४ पासून जनता यावर उपाय करीत आहे. पुढेही आम्हालाचजनतेचा पाठबळ मिळेल. ऊसाबाबत उपलब्ध असलेली आकडेवारीच सध्याचे सरकार, समाजवादी पार्टी आणि बसपा यांच्यातील वास्तव दाखवून देते.
आधीच्या सरकारांनी कोट्यवधी थकवले
बसपा सरकारच्या २००७ ते २०२१ या काळात ५२१३१ कोटी रुपयांची थकबाकी होती. समाजवादी पार्टीच्या सरकारच्या काळात २०१२-२०१७ या काळात ९५२१५ कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकले. दोन्ही सरकारांच्या दहा वर्षांच्या कालखंडात १ लाख ४७ हजार ३४६ कोटी रुपये थकीत राहिले. तर योगी सरकारच्या आजवरच्या कालावधीत आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ लाख २२ हजार २५१ कोटी रुपयांचे वितरण केले आहे असे मंत्र्यांनी सांगितले.
सरकारची कामगिरी
योगी सरकारने बंद वीस साखर कारखाने सुरू केले. गेल्या २५ वर्षात प्रथमच २४३ नवी गुऱ्हाळघरे सुरू करण्याचे परवाने दिले. सध्या १३३ गुऱ्हाळे सुरू आहेत. यामध्ये २७३ कोटींची गुंतवणूक असून १६ हजार ५०० जणांना रोजगार मिळेल. २४३ नव्या गुऱ्हाळांमुळे ५० हजार रोजगार मिळतील. गेल्या सरकारच्या काळात, दहा वर्षात २१ साखर कारखाने बंद होते. उत्तर भारतामध्ये फक्त मुंडेरवामध्ये ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादन होईल. संभल आणि सहारनपूर हे बंद साखर कारखाने सरकारने सुरू केले. गेल्या आठ वर्षापासून बंद वीनस, दया आणि वेव साखर कारखाने सुरू करण्यात आले असून सठियाव आणि नजीबाबाद या साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल प्लान्ट सुरू करण्यात आल्याचेही मंत्री राणा यांनी सांगितले.