उत्तर प्रदेश : राज्य सरकार लवकरच उसाची राज्य सल्लागार किंमत (SAP) जाहीर करू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊसाच्या किमतीचा मुद्दा विचारार्थ मांडला जाणार होता. तथापि, या विषयावर कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र, लवकरच सरकार चालू गळीत हंगाम २०२४-२५ साठी उसाच्या राज्य सल्लागार किंमतीला मान्यता देऊ शकते अशी अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशातही उसाचा भाव किमान ४०० रुपयांच्या पुढे गेला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
‘रुरल व्हाइस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गेल्या हंगामात, २०२३-२४ मध्ये, उत्तर प्रदेश सरकारने उसाच्या एसएपीमध्ये प्रति क्विंटल २० रुपये वाढ केली होती. लवकर पक्व होणाऱ्या वाणांसाठी ती ३७० रुपये निश्चित केली होती. पण यावेळी, हंगाम सुरू होऊन अनेक महिने उलटून गेले तरी, उसाचा भाव जाहीर झालेला नाही. हरियाणामध्ये उसाचा भाव ४०० रुपये प्रति क्विंटल आणि पंजाबमध्ये ४०१ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे.
राज्यात, गेल्या सात वर्षांत, उसाच्या एसएपीमध्ये प्रति क्विंटल फक्त तीनदा १०, २५ आणि २० रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. तर चार वेळा वाढ ठेवण्यात आली नाही. सात वर्षांत उसाच्या किमतीत एकूण ५५ रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, उसापासून साखर उतारा घटल्याने आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्याने साखर कारखान्यांना यावर्षी उसाच्या एसएपीमध्ये वाढ नको आहे. पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून दरवाढीची मागणी आहे. कारण साखर कारखाने साखरेव्यतिरिक्त, इथेनॉल आणि इतर सह-उत्पादनांमधून देखील कमाई करतात.