लखनौ : उत्तर प्रदेशात सर्व साखर कारखान्यांनी २०२४-२५ च्या हंगामात गाळप सुरू केले आहे. यासोबतच राज्यात ऊस दरवाढीचा मुद्दा जोर धरताना दिसत आहे. याबाबत विधानसभेत उसाच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्याबाबत जोरदार आवाज उठवण्यात आला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान समाजवादी पार्टीचे पंकज मलिक यांनी वाढत्या महागाईमुळे सरकार उसाच्या आधारभूत किमतीत वाढ करणार का, असा प्रश्न उपस्थित केला.
यावर ऊस विकास आणि साखर कारखाना विभागाचे मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ऊस दर कधी वाढणार याची माहिती देण्यात आलेली नाही. ऊस उत्पादक शेतकरी आणि राज्यातील शेतकरी संघटनांनी वाढलेल्या खर्चाचे कारण देत किमान ४५० रुपये प्रती क्विंटल वाढ करण्याची मागणी करत आहेत. बीकेयू अराजकीय, बीकेयू टिकैत, किसान न्याय मोर्चा, भारतीय किसान युनियन असली आदी संघटना उसाला प्रती क्विंटल ४५० रुपये भाव देण्याची मागणी करत राज्य सरकारवर दबाव आणला आहे.