नवी दिल्ली : गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात अव्वल स्थान पटकावले आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील २१० कारखान्यांच्या तुलनेत केवळ ११८ कारखान्यांनी हंगामात सहभाग घेतला होता हे विशेष. तरीही साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशच्या तुलनेत कमी ऊस क्षेत्र, अवकाळी पाऊस, इथेनॉलसाठी डायव्हर्शन आणि पिकावरील किडींचा फैलावर असल्याने महाराष्ट्रात ऊस आणि साखर उत्पादनात घसरण दिसून आली आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.
उत्तर प्रदेशचे ऊस विकास आणि साखर कारखाना मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी पीटीआयला सांगितले की, हंगाम २०२२-२३ मध्ये उत्तर प्रदेशकडून उत्पादित एकूण साखर १०७.२९ लाख टन आहे. (यामध्ये ३.०५ लाख टन खांडसारी (तरल गुळापासून भौतिक रुपात काढलेली साखर) समाविष्ट आहे.) तर महाराष्ट्रात १०५.३० लाख टन साखर उत्पादन झाले. युपीमध्ये साखर कारखान्यांकडून एकूण ऊस गाळप १०८४.५७ लाख टन झाले आहे. तर महाराष्ट्रात १०५३ लाख टन झाले आहे. उत्तर प्रदेशात १९.८४ लाख टन साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये केले आहे. तर महाराष्ट्रात हा आकडा १५.७० लाख टन होता.