लखनौ : उत्तर प्रदेश देशात इथेनॉल उत्पादनात प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असे प्रतिपादन ऊस विकास आणि साखर उद्योग मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी केले. ते म्हणाले की, राज्यात इथेनॉल उद्योगातील उलाढाल १२ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. उत्तर प्रदेशची इथेनॉल उत्पादन क्षमता प्रतिवर्ष दोन अब्ज लिटरपर्यंत पोहोचली आहे. पाच वर्षांपूर्वी ही क्षमता प्रती वर्षी २४० दशलक्ष लिटर होती. उत्तर प्रदेश ने आपली इथेनॉल उत्पादन क्षमता आधीपेक्षा जवळपास आठपट वाढविल्याचे त्यांनी सांगितले.
सीआयआय – शुगरटेक परिषदेत मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी बोलत होते. ते म्हणाले, पुढील काही वर्षांत राज्याची इथेनॉल क्षमता प्रतिवर्ष २.२५ अब्ज लिटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.राज्याचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकासात साखर उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. साखर उद्योगातून उत्तर प्रदेशात ४.५ दशलक्षाहून अधिक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. राज्याची साखर उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे ५० हजार कोटी रुपयांची आहे.
‘सीआयआय’च्या युपी स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष आकाश गोयंका म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेत आणि कृषी उत्पादनांच्या विकासात साखर उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कार्यक्रमात डीसीएम श्रीराम लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व सीईओ रोशन लाल तामक, पद्मश्री डॉ. बक्शी राम आदी उपस्थित होते.