लखनौ : उत्तर प्रदेशात डिस्टिलरी उद्योग गतीने वाढत आहे. यासाठी आता ऊसाऐवजी मक्क्याचा वापर केला जाऊ लागला आहे. जास्तीत जास्त इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत देशाच्या एकूण इथेनॉल उत्पादनात उत्तर प्रदेशचा हिस्सा २० टक्के आहे. पुढील वर्षापर्यंत तो वाढून ४५ टक्के होईल. उत्तर प्रदेश डिस्टिलरी असोसिएशनच्यावतीने आयोजित समिटमध्ये ही माहिती देण्यात आली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, असोसिएशनचे अध्यक्ष एस. के. शुक्ल यांनी सांगितले की, ब्राझील आणि अमेरिकेसोबत भागिदारी केल्यानंतर अनेक मोठे बदल घडतील. आता मक्का, तुकडा तांदूळ, जवस आदींपासून इथेनॉल उत्पादन होईल. यासोबतच मक्का पिक उत्पादनात खास तांत्रिक प्रयोग केला जाणार आहे. त्यातून तिप्पट उत्पादन होईल. शेतकऱ्यांना जादा उत्पादन मिळू शकेल.
शुक्ल यांनी सांगितले की, अनेक आंतरराष्ट्रीय डिस्टिलरी उद्योग युपीमध्ये कायदा व सुव्यवस्था चांगली असल्याने गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत. जवळपास १० हजार कोटींच्या गुंतवणुकीसह सीतापूर, वाराणसी, गोरखपूरसह अनेक जिल्ह्यात डिस्टिलरी उद्योग सुरू होत आहेत. सध्या एक लाख किलो लिटर इथेनॉल उत्पादन केले जाते. हे उत्पादन १० लाख किलो लिटर करण्याचे उद्दिष्ट लवकरात लवकर गाठले जाईल. असोसिएशनचे उपाध्यक्ष मनीष अग्रवाल, सरचिटणीस रजनीश अग्रवाल यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली समीट झाले. वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. सुनील कुमार मिश्रा यांनी आभार मानले.