रुडकी : इकबालपूर साखर कारखान्याने रविवारी रात्री गळीत हंगाम समाप्तीची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून पुरेसा ऊस पुरवठा होत नसल्याने कारखान्यामध्ये नो केन अशी स्थिती होती. २०२२-२३ या हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत सहा लाख क्विंटल कमी गाळप झाले आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, इकबालपूर साखर कारखान्याचे ऊस विभागाचे व्यवस्थापक शिव कुमार सिसोदिया यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून नो केन स्थिती असल्याने कारखान्याला नुकसान सोसावे लागत होते. दिवसा ऊस खरेदी केंद्रे आणि कारखान्याच्या गेटवरील खरेदी केंद्रात आलेला ऊस एकत्र करून रात्री गाळप केले जात होते. रविवारी विभागातील बहुतांश गावांतील ऊस खरेदी पूर्णपणे बंद पडली. काहीच आवक झाली नाही.
संध्याकाळपर्यंत गेटवर जेवढ्या शेतकऱ्यांनी ऊस आणला, तो स्वीकारून गळीत हंगाम समाप्तीची घोषणा करण्यात आली. यंदा ५८ लाख क्विंटल उसाचे गाळप कारखान्याने केले आहे. गेल्या हंगामापेक्षा हे गाळप सहा लाख क्विंटलने कमी आहे. गेल्या हंगामात कारखान्याने ६३.९० लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले होते. गेल्यावर्षी २२ एप्रिल रोजी हंगाम समाप्त झाला होता. यंदा २१ फेब्रुवारीपर्यंतचे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना बिले अदा करण्यात आली आहेत. आता उर्वरीत शेतकऱ्यांना ऊस बिले दिली जातील.