रुडकी : गळीत हंगाम समाप्त होवून दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. तरीही शेतकऱ्यांचे पैसे साखर कारखान्यांनी थकवले आहेत. हे पैसे लवकर मिळाले नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय किसान युनियनच्या तोमर गटाने दिला आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यंदा पावसाने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. गळीत हंगामात उत्तम साखर कारखान्याने जवळपास एक महिन्याची ऊस बिले थकवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. याबाबत भारतीय किसान युनियनच्या तोमर गटाचे जिल्हाध्यक्ष विकेश बालियान यांनी सांगितले की, गळीत हंगामाच्या सुरुवातीला कारखान्याने ऊस बिले दिली. मात्र, अखेरच्या टप्प्यात पैसे दिले नाहीत.
गेल्या दोन महिन्यांपासून एकही रुपया न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील ऊभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी हंगामातही त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्याची चिंता सतावत आहे. एक आठवड्यात जर शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले मिळाली नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.