किच्छा : धौराडाम विभागातील ऊस पिकावर पोक्का बोईंग रोगाचा फैलाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाला या रोगाविषयी माहिती दिली आहे. त्यानंतर रोगापासून पिकाचा बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक ऊस उपायुक्तांनी दिली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या विभागात ऊस हेच मुख्य पिक आहे. ऊसावर सध्या पोक्का बोईंग रोगाचा फैलाव झाल्याने नुकसानीची भीती आहे. या रोगाचा फैलाव जेव्हा होतो, तेव्हा ऊसाच्या पानांवर पिवळे ठिपके दिसतात. पानांचा वरील भाग कुजतो आणि उसाचे गड्डे वाळतात. पाने पूर्णपणे वाळून जातात. बखपूरचे माजी सरपंच परविंदर सिंह यांनी सांगितले की, बखपूर आणि नजीमाबादमध्ये ऊस पिकावर या रोगाचा फैलाव झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.
या विभागात रोगाच्या फैलावामुळे पिकाचे जवळपास ८० टक्के नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या रोगाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. सहाय्यक ऊस आयुक्त कपिल मोहन म्हणाले की, संक्रमित पानांची तपासणी करून पिकाचा बचाव कसा करता येईल, याचे प्रयत्न विभागाने सुरू केले आहेत.