काशीपूर : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गतीने ऊस बिले मिळावीत यासाठी उत्तराखंड सरकारने सहकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील साखर कारखान्यांसाठी ११५ कोटी रुपये अनुदानाचा आदेश जारी केला आहे. हंगाम २०२२-२३ मधील ऊस बिलांसाठी हे पैसे अनुदान म्हणून दिले जातील, असे ऊस तथा साखर आयुक्त हंसा दत्त पांडे यांनी सांगितले. राज्यातील साखर कारखान्यांनी यंदा ४७२ लाख ४१ हजार क्विंटल उसाचे गाळप केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३६ लाख क्विंटल गाळप अधिक झाले आहे, असे ते म्हणाले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यंदा राज्यात ४७ लाख ५८ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत हे उत्पादन २ लाख २५ हजार क्विंटल अधिक आहे. साखर कारखान्यांनी १,६५७ कोटी ८२ लाख रुपयांच्या उसाची खरेदी केली. त्यातुलनेत १,२१५ कोटी ४७ लाख रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. अद्याप ४४२ कोटी ४५ लाख रुपये थकीत आहेत. ते देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
सितारागंज साखर कारखान्याने १०० टक्के ऊस बिले अदा केली. शेतकऱ्यांना आतापर्यंत ७३ टक्के बिले मिळाली आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत ५ टक्के अधिक बिले दिली गेली आहेत. सरकारने दिल्लीच्या जेजीएन शुगर अँड बायोफ्यूएल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सितारगंज सहकारी साखर कारखाना तीस वर्षांसाठी लीजवर देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील हंगामापासून पीपीपी तत्त्वावर कारखाना चालविण्याची कार्यवाही होईल, असे सांगण्यात आले. कारखान्याची गाळप क्षमता २५०० टीडीसीवरुन वाढवून ४९०० टीडीसी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर लवकरच निर्णय होणार आहे.