पुणे : राज्यातील सर्व साखर कारखानदारांनी आपल्या क्षेत्रातील स्थलांतरीत ऊस तोडणी मजुरांचे लसीकरण करावे असे निर्देश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी कारखान्यांना पत्र पाठवले आहे. बहुतांश ऊस तोडणी मजुर आपल्या गावाकडून कारखाना कार्यक्षेत्रात आले आहेत. ते कोविडच्या दुसऱ्या डोस पासून वंचित राहू शकतात. मुख्यत्वे बीड, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील ५-६ लाख कामगार राज्यभरातील साखर कारखान्यांमध्ये ऊस तोडणीसाठी जातात. हे मजूर दीपावली नंतर ऊस तोडणीच्या क्षेत्रात तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहतात.
एप्रिल-मे महिन्यात हंगाम संपल्यानंतर घरी परततात. या कालावधीत गावागावातील पुरुष व स्त्री ऊस तोडणी मजुर कामाला जात असतात.
या कामगार वर्गात लसीकरण उशीरा सुरू झाल्याने केवळ पहिला डोस मिळाला आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, गायकवाड यांनी लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून दिलेल्या निर्देशांचा पत्रात उल्लेख केला आहे. हंगामापूर्वी बहुतांश कारखान्यांनी कामगारांकडून लसीकरणाची विचारणा केली होती. मुकादमांकडून माहिती घेतली होती. आता अनेक कारखान्यांनी आपल्या कामगारांच्या लसीकरणासाठी स्वतः तयारी सुरू केली आहे.