बीड : परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कारखान्याकडे २०३ कोटी ६९ लाख रुपये थकीत आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाने या कर्ज वसुलीसाठी कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया जाहीर केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. जीएसटी विभागानेही काही दिवसांपूर्वी थकीत १९ कोटी रुपये भरण्यासाठी नोटीस बजावली होती.
युनियन बँक ऑफ इंडियाने लिलावाची प्रक्रिया हाती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उस्मानपुरा येथील युनियन बैंक ऑफ इंडियाच्या शाखेचे २० एप्रिल २०२१ पासून २०३ कोटी ६९ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी, व्याज व इतर कर्ज वसुलीसाठी बँकेच्या अहमदनगर कार्यालयाने ही प्रक्रिया सुरू केली असून २५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हा ऑनलाइन लिलाव होईल. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी हा कारखाना उभा केला होता. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी हा कारखाना उभारला होता. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., पंकजा मुंडे, यशश्री मुंडे यांच्यासह २३ जणांच्या नावाने ही नोटीस काढण्यात आली आहे.