सातारा : वर्धन ॲग्रो कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी, एक डिसेंबरपासून येणाऱ्या उसाला प्रती टन ३,१११ रुपये दर जाहीर केला आहे. तर मालक तोडणी केलेल्या ऊसाला प्रती टन ४,१११ रुपये अंतिम दर दिला जाईल, अशी घोषणा ‘वर्धन’चे चेअरमन धैर्यशील कदम यांनी केली. कारखाना कार्यस्थळावर चेअरमन धैर्यशील कदम यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या उपस्थितीत बैठक झाली. उसाची बिले पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय यावेळी झाला.
धैर्यशील कदम म्हणाले की, कारखान्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाची बिले वेळेत दिली आहेत. उसाला प्रती टन ३,१११ रुपये अंतिम दर तर शेतकऱ्याला स्वतः ऊस तोडीसाठी ऊस तोडणी, वाहतूक कमिशनसह ४,१११ रुपये अंतिम दर दिला जाईल. ज्येष्ठ संचालक भीमराव काका पाटील, संपतराव माने, भीमराव डांगे, सुदाम दीक्षित, सत्वशील कदम, सुनील पाटील, दीपक लिमकर, यशवंत चव्हाण, पृथ्वीराज निकम, अविनाश साळुंखे, सतीश सोलापुरे, दत्तात्रय साळुंखे, संतोष घाडगे, शरद चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान, कारखान्याने सहवीज प्रकल्प नसतानासुद्धा उच्चांकी दर देण्याचा निर्णय जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे असे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी सांगितले.