सातारा : वर्धन ॲग्रो कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामास दिमाखात सुरूवात झाली आहे. सहाव्या हंगामात गाळपास आलेल्या उसाच्या प्रमाणात टनेजची साखर सवलतीच्या दराने व सभासदांना मोफत आणि कामगारांना प्रत्येकी पाच किलो मोफत साखर वाटपास सुरुवात झाली आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे सर्वांची दिवाळी गोड होईल, असा विश्वास ‘वर्धन’चे चेअरमन भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला.
कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी ते बोलत होते. कदम म्हणाले की, गत हंगामात कारखान्याने दोन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. ऊसबिले वेळेत खात्यावर वर्ग करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. कारखाना व्यवस्थापनाने नेहमी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. गेल्या सात वर्षापासून ८.३३% बोनस कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. मागील तीन वर्षापासून ऊस उत्पादकांना टनेजची साखर सवलतीच्या दरात देण्यास वर्धन कारखान्याने सुरुवात केली आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत कारखाना दोन ते अडीच महिने लवकर सुरू करण्यात आला आहे.
जास्तीत जास्त दिवस कारखाना चालवून कारखान्याकडे नोंद असलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही. सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाचे सॅम्पल देऊन ऊस तोडीच्या प्रोग्रामला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. वर्धन ॲग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम म्हणाले, गेल्या सात वर्षात अनेक संकटावर मात करत कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी कारखाना व्यवस्थापन व कारखान्याच्या सर्व घटकांनी प्रयत्न केले आहेत. आम्ही सक्षमपणे ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगारांच्या पाठीमागे उभे आहोत. चेअरमन धैर्यशील कदम यांनी शब्द दिल्याप्रमाणे टनेजच्या प्रमाणात सवलतीच्या दराने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, सभासदांना मोफत तर कामगारांना ८.३३% बोनस व ५ किलो साखर मोफत वाटप सुरू आहे. त्यामुळे वर्धनच्या सर्व घटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.