नांदेड : भैरवनाथ शुगर वर्क्स यांनी भाडे करारनामा रद्द करण्याबाबत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेस दिलेले पत्र हे नजर चूकीने पाठविण्यात आले असून त्यात कुठलीही सत्यता नाही. आम्ही पूर्ण क्षमतेने कार्यरत आहोत. सद्यस्थितीत बॉयलरच्या टेक्निकल टीमचे कार्य व इतर अंतर्गत कामे ही वेगाने सुरू आहेत. माजी खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर वसंत सहकारी कारखाना शेतकरी हितार्थ हंगामी गाळपास सज्ज असेल. वसंत सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरूचं राहणार असल्याची ग्वाही कारखान्याचे चेअरमन अजय देशमुख यांनी दिली आहे.
शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपा यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुतडा उपस्थित होते. नजरचुकीने भैरवनाथ शुगर वर्क्सकडून बँकेस गेलेले पत्र काही असंतुष्ट मंडळी समाज माध्यमावर व्हायरल करून वारंवार नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रकार हेतुपुरस्सरपणे केला जात आहे. परिसरातील ऊस उत्पादकांना ते घाबरवीत आहेत. मी अगदी ठामपणे सांगतो की, हरितक्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईकांच्या कर्मभूमीतील, त्यांचे नावे असलेला वसंत साखर कारखाना कदापिही बंद पडू देणार नाही. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर गतवर्षीपासून आम्ही वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवित आहोत. यापुढेही वसंत सुरू रहावा यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे देशमुख यांनी सांगितले.