सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे केवळ १७ कोटींचे कर्ज वसंतदादा साखर कारखान्याकडे थकीत राहिले आहे. त्या कर्जाची परतफेड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्या कर्जाची परतफेड केली जाईल. कारखाना दत्त इंडिया कंपनीकडून लवकरच पुन्हा सभासदांच्या ताब्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली. साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विशाल पाटील म्हणाले की, कारखान्यावर सध्या फक्त एकाच बँकेचे कर्ज आहे. कारखान्यातर्फे बँक ऑफ इंडियाकडील सर्व कर्जाची फेड केली आहे. त्यामुळे हे कर्ज फेडून कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात येईल.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, कारखान्याचा संबंध नसताना राजकीय हेतूने डिस्टिलरी विभाग बंद ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. लवकरच निर्णय कारखान्याच्या बाजूने लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तीन वर्षांपूर्वी डिस्टिलरीतील यंत्रांची तपासणी झाली. त्यानंतर काही कारणांनी कृष्णा नदीतील मासे मृत झाले. मात्र, यात कारखान्याचा काहीच दोष नाही. प्रशासन, युनियन व कामगारांत तडजोड झाली आहे. १६०० कामगारांची देणी दिली जात आहेत. तांत्रिक कारणाने गेली आठ महिने बंद असलेला पेट्रोल पंप लवकरच सुरू केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सभेत कामगार नेते प्रदीप शिंदे, शिवसेनेचे बजरंग पाटील, बाळासाहेब पाटील, शेतकरी संघटनेचे प्रभाकर पाटील, सुनील फराटे आदींनी प्रश्न मांडले. उपाध्यक्ष सुनील आवटी, संभाजी सावर्डेकर, माजी उपमहापौर उमेश पाटील, पी. एल. रजपूत, सुनील खोत उपस्थित होते. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी आभार मानले.