पुणे : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे विघ्नहर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. उसाचे सरासरी एकरी टनेज घटण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात यंदा २४,७१५ एकर ऊस क्षेत्राची नोंद आहे. यंदा १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन विघ्नेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअमरन सत्यशिल शेरकर यांनी केले. कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते.
निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे नारायणगाव ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर व त्यांच्या पत्नी मोनिका यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आला. अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन अशोक घोलप होते. यावेळी कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
अनिल तात्या मेहेर म्हणाले की, ग्रामोन्नती मंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत परदेशांमधून उसाच्या नवनवीन जातींचे वाण आणून त्यावर संशोधन करून नवीन वाण विकसित करण्यात येत आहेत. त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा. पाऊस कमी झाल्याने पाणी बचतीचे धोरण अवलंबावे लागणार आहे. व्हाईस चेअरमन अशोक घोलप म्हणाले की, विविध योजनांच्या माध्यमातून कारखाना प्रगतीपथावर आहे. सुहास शेटे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक विवेक काकडे यांनी आभार मानले.