पुणे (निवृत्तीनगर): यावर्षी शासनाने 15 ऑक्टोबरला ऊस गाळप सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखानाही त्याच दिवशी गाळप सुरु करणार असून, कारखाना यावर्षी 10 लाख टन ऊस गाळप करणार असल्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी कारखान्याच्या 35 व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यात सांगितले.
हा कार्यक्रम कारखान्याचे ज्येष्ठ संचालक नामदेव थोरात आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी थोरात यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. शेरकर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही यंदा हंगामासाठी कारखान्यांच्या परिसरात सभासद आणि बिगर सभासदांच्या 24 हजार 350 एकर ऊसाची नोंदणी झाली असून, यंदाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी 665 बैलगाड्या , 298 ट्रॅक़्टर, 596 टॅक्टर टोळ्या, 292 ट्रक टोळ्या, 11 ऊस तोडणी यंत्रांचे करार केलेले आहेत.
गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून मशिनची दुरुस्ती देखभालही पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसर्या जिल्ह्यातून ऊस तोडणी कामगार कारखान्यावर येणार असल्याने योग्य ती काळजी घेऊन हंगाम पार पाडण्यासाठीही कारखाना सज्ज आहे.
एफआरपी मध्ये 100 रुपये वाढ करुनही साखेरच्या किमान विक्री किंमतीमध्ये कसलीच वाढ झालेली नाही, त्यामुळे शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रयत्न झाला आहे. साखरेची किमान किंमत 3100 वरुन 3500 ते 3600 रुपये केल्यास कारखान्याला उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ साधता येईल. शिवाय साखर निर्यातीचे दोन वर्षांचे अनुदानही केंद्र शासनाकडून प्रलंबित आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांनी केले. तर उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार मानले. यावेळी योगिता शेरकर, सर्व संचालक, अधिकारी, कामगार आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.