पुणे : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अद्याप ७५ हजार टन उसाचे गाळप करणे बाकी आहे. २६ ते २७ एप्रिलअखेरपर्यंत कारखाना सुरू राहणार आहे. या काळात कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप केले जाईल, असे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले. कारखान्याने गेल्या १६३ दिवसांमध्ये ९ लाख ३६ हजार ५०० टन उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत १० लाख ४५ हजार ९०० साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे अशी माहितीही शेरेकर यांनी दिली.
कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष, माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संचालक मंडळ कार्यरत आहे. कारखाना उसाची तोडणी करताना सभासद, बिगर सभासद असा कोणताही भेदभाव करत नाही. उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने नेहमीच केला आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे उसाची लागवड कमी झाली असून, याचा फटका पुढील वर्षाच्या गळीत हंगामाला बसू शकतो. कारखाना १ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आला. हंगामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.