कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गेल्या २०२३ २०२४ च्या गळीत हंगामातील २०० रुपये अंतिम हप्ता व चालू २०२४- २५ च्या गळीत हंगामात पहिल्या उचलेची प्रतिटन ३,७०० रुपयांची मागणी केली होती. आता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे ऊस दर ठरविण्यासाठी आगामी १५ दिवसांत साखर कारखानदार व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीने संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. याबाबत राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत शेट्टी यांनी म्हटले आहे की, मध्यंतरी आलेला महापूर, विधानसभा निवडणुकीमुळे लांबलेला गळीत हंगाम यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. कडक उन्हाळ्यामुळे मजुराकडून व ऊस तोडणी मशिन मालकाकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते. एकरी ५ ते १० हजार रुपयांची मागणी केली जाते. ही पिळवणूक थांबवावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे. सद्यस्थितीत साखर कारखान्यांनी तोडणी वाहतूक वजा जाता ३७०० रुपये पहिली उचल जाहीर करण्यास काही अडचण नाही. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक बोलवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.